20
हिज्कीयाचे दुखणे
2 इति. 32:24-26; यश. 38:1-8
याच सुमारास हिज्कीया आजारी पडून मरणास टेकला. तेव्हा आमोजचा मुलगा यशया हा संदेष्टा त्याच्याकडे येऊन म्हणाला, “परमेश्वराचे म्हणणे आहे, ‘तुझ्या घराची तू व्यवस्था कर, कारण तू मरणार, वाचणार नाहीस.” तेव्हा हिज्कीयाने आपले तोंड भिंतीकडे वळवले आणि परमेश्वराची प्रार्थना करून तो म्हणाला. “परमेश्वरा, मी तुझी मन:पूर्वक सेवा केली आहे हे लक्षात असू दे. तुझ्या दृष्टीने जे उचित तेच मी केले.” तेव्हा हिज्कीया फार रडला. यशया मधला चौक ओलांडून शहराच्या बाहेर जाण्यापूर्वी पुन्हा त्यास परमेश्वराचे शब्द ऐकू आले. परमेश्वर म्हणाला, “पुन्हा मागे फिर आणि माझ्या प्रजेचा नेता हिज्कीया याच्याशी बोल.” त्यास म्हणावे, “तुझा पूर्वज दावीद याचा परमेश्वर देव म्हणतो: तुझी प्रार्थना मी ऐकली आहे आणि तुझे अश्रू पाहिले आहेत. तेव्हा मी तुला बरे करतो, तिसऱ्या दिवशी तू परमेश्वराचे मंदिर चढून जाशील. तुला मी आणखी पंधरा वर्ष आयुष्य दिले आहे. अश्शूरच्या राजाच्या हातून तुझी आणि या नगराची मी सोडवणूक करीन. या नगराचे मी रक्षण करीन स्वत:साठी तसेच माझा सेवक दावीद याला मी दिलेल्या वचनासाठी मी हे करीन.” मग यशया म्हणाला, “अंजीराचे मिश्रण करुन ते याच्या दुखऱ्या भागावर लावा.” तेव्हा त्यांनी अंजीरांचे मिश्रण करून हिज्कीयाच्या दुखऱ्या भागावर त्याचा लेप दिला. तेव्हा हिज्कीया बरा झाला. हिज्कीया यशयाला म्हणाला, “परमेश्वराच्या कृपेने माझ्या प्रकृतीला उतार पडेल आणि तिसऱ्या दिवशी मी परमेश्वराचे मंदिर चढू शकेन याबद्दल काही खूण देता येईल का?” यशया म्हणाला, “तुला काय हवे बोल. सावली दहा पावले पुढे जाऊ किंवा मागे येऊ दे? परमेश्वराने तुझ्या बाबतीत जे घडेल असे कबूल केले आहे त्याची ही खूण आहे.” 10 हिज्कीया म्हणाला, “सावली दहा पावले पुढे जाणे स्वाभाविक आहे. तेव्हा तसे नको, ती दहा पावले मागे यावी.” 11 मग यशया संदेष्ट्याने परमेश्वराची प्रार्थना केली याप्रकारे परमेश्वराने आहाजाची सावली दहा पावले मागे घेतली. जिथून ती पुढे गेली होती तिथेच ती पूर्ववत आली.
हिज्कीयाला बाबेलचे जासूद भेटतात
यश. 39:1-8
12 यावेळी बलदानचा मुलगा बरोदख-बलदान हा बाबेलचा राजा होता. त्याने हिज्कीयाकडे पत्रे आणि भेटवस्तू पाठवल्या. हिज्कीया आजारी असल्याचे त्याने ऐकले होते. 13 हिज्कीयाने त्याच्याकडून आलेल्या मनुष्यांचे आगतस्वागत केले. त्यांना आपल्या घरातील सर्व मौल्यवान वस्तू दाखवल्या. सोने, चांदी, मसाल्याचे पदार्थ, किंमती अत्तरे, शस्त्रास्त्रे असा आपला सर्व खजिना त्यांना दाखवला. आपल्या घरातील आणि राज्यातील कोणतीही गोष्ट त्याने त्यांना दाखवायची शिल्लक ठेवली नाही. 14 तेव्हा यशया संदेष्टा राजाकडे येऊन म्हणाला, “हे लोक कोण? त्यांचे काय म्हणणे आहे?” हिज्कीया म्हणाला, “हे फार लांबच्या प्रांतातून बाबेलमधून आले आहेत.” 15 यशयाने विचारले, “त्यांनी या घरातले काय काय पाहिले?” हिज्कीयाने सांगितले, “त्यांनी सगळेच पाहिले. माझे सगळे भांडार मी त्यांच्यापुढे उघडे केले.” 16 तेव्हा यशया हिज्कीयाला म्हणाला, “आता परमेश्वराचा हा निरोप ऐक. 17 तुझ्या घरातील सर्व चीजवस्तू आणि तुझ्या पूर्वजांनी जमवलेले सर्व धन आत्ता बाबेलला नेण्यात येईल. ती वेळ आता येऊन ठेपली आहे. काही म्हणता काही मागे उरणार नाही. ही परमेश्वराची वाणी आहे. 18 बाबेलचे लोक तुझ्या मुलांना घेऊन जातील. ती मुले बाबेलच्या राजवाड्यात खोजे बनून राहतील.” 19 तेव्हा हिज्कीया यशयाला म्हणाला, “परमेश्वराचे म्हणणे योग्यच आहे.” तो पुढे म्हणाला, “निदान माझ्या कारकिर्दीत तरी शांतता लाभेल ना?”
हीज्कीयाचा मृत्यू
2 इति. 32:32-33
20 शहराला पाणीपुरवठा करणारी तळी आणि कालवे यांच्यासकट हिज्कीयाने जी कामगिरी बजावली तिची नोंद यहूदाच्या राजांचा इतिहास या पुस्तकात आहे. 21 हिज्कीया निधन पावला आणि त्याचा पूर्वजांशेजारी त्याचे दफन झाले. त्याचा मुलगा मनश्शे गादीवर आला.