13
1 स्वप्नांचा अर्थ सांगणारा एखादा संदेष्टा तुमच्याकडे एखाद्या वेळी येईल. आपण काही चिन्ह, किंवा चमत्कार दाखवतो असे तो म्हणेल. 2 कदाचित् त्या चिन्हाचा तुम्हास पडताळा येईल किंवा चमत्कार खराही ठरेल. मग तो, तुम्हास अपरिचित अशा इतर दैवतांची सेवा करायला सुचवेल. 3 तरी त्या संदेष्टयाचे किंवा स्वप्न पाहणाऱ्याचे ऐकू नका. कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्यांच्यावर संपूर्ण मनाने व संपूर्ण जिवाने प्रीती करता कि नाही हे पाहण्यासाठी तुमचा देव परमेश्वर तुमची परीक्षा पाहत असेल. 4 तेव्हा तुम्ही आपल्या परमेश्वर देवालाच अनुसरा. त्याचे भय बाळगा त्याच्या आज्ञा पाळा. त्याची वाणी ऐका, त्याची सेवा करा आणि त्यालाच बिलगूण राहा. 5 तसेच त्या संदेष्ट्याला किंवा स्वप्न सांगणाऱ्याला ठार मारा. कारण तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास मिसर देशात तुम्ही गुलाम होता तेव्हा तेथून सोडवले आहे. परमेश्वर देवाने आज्ञा देऊन नेमून दिलेल्या जीवनमार्गापासून हा मनुष्य तुम्हास दूर नेतो म्हणून आपल्यामधून तुम्ही या दुष्टाईचे निर्मूलन करा. 6 तुमच्या निकटची एखादी व्यक्ती हळूच तुम्हास दुसऱ्या दैवताच्या भजनी लावायचा प्रयत्न करील. ही व्यक्ती म्हणजे तुमचा सख्खा भाऊ, मुलगा, मुलगी, प्रिय पत्नी, किंवा जिवलग मित्रही असू शकतो. तो म्हणेल, चल आपण या दुसऱ्या दैवताची पूजा करु. तुझ्या किंवा तुझ्या पूर्वजांच्या ऐकण्यातही नसलेले हे दैवत असेल 7 (मग ते देव तुमच्या भोवताली जवळपास किंवा लांब राहणारे आसपासच्या किंवा दुरच्या राष्ट्राचे असोत.) 8 त्या व्यक्तीच्या म्हणण्याला मान्यता देऊ नका. त्याचे ऐकू नका. त्याची गय येऊ देऊ नका. त्यास मोकळा सोडू नका. तसेच त्यास लपवू नका. 9 त्यास ठार करा. त्यास दगडांनी मारा. पहिला दगड तुम्ही उचला आणि मारायला सुरूवात करा. मग इतर जण त्यास दगडांनी मारतील. 10 मरेपर्यंत त्यास दगडमार करावी; कारण मिसरमधून ज्याने तुम्हास दास्यातून सोडवले त्या परमेश्वर देवापासूनच हा तुम्हास बहकवायचा प्रयत्न करत आहे. 11 ही गोष्ट सर्व इस्राएलांच्या कानावर गेली की त्यांनी ही भीती वाटेल, आणि अशी दुष्कृत्ये करायला ते धजावणार नाहीत. 12 तुम्हास राहण्याकरता तुमचा देव परमेश्वर नगरे देईल. त्यापैकी एखाद्या नगरातून तुमच्या कानावर वाईट बातमी येईल. ती अशी की, 13 तुमच्यापैकीच काही नीच माणसे* बेलीएल चे पुत्र आपल्यापैकी काही जणांना कुमार्गाला लावत आहेत. आपण अन्य दैवतांची सेवा करु या, असे म्हणून त्यांनी नगरातील लोकांस बहकावले आहेत. (ही दैवते तुम्हास अपरीचीत असतील.) 14 असे काही कानावर आल्यास ते खरे आहे की नाही याची आधी पूर्ण शहानिशा करून घ्या. ते खरे निघाले, असे काही भयंकर घडल्याचे सिद्ध झाले, 15 तर त्या नगरातील लोकांस त्याचे शासन द्या. त्या सर्वांचा तलवारीने वध करा. त्यांच्या जनावरांनाही शिल्लक ठेवू नका. ते शहर पूर्णपणे उध्वस्त करा. 16 मग तेथील सर्व मौल्यवान वस्तू गोळा करून शहराच्या मध्यभागी आणा. आणि त्याचबरोबर सर्व शहर बेचिराख करून टाका. ते तुमचा देव परमेश्वर याचे होमार्पण असेल. ते शहर पुन्हा कधीच वसवता कामा नये. 17 ते नगर नाश करायला परमेश्वराच्या हवाली केले जावे म्हणून त्यातील कोणतीही वस्तू स्वत:साठी ठेवून घेऊ नका. ही आज्ञा ऐकलीत तर परमेश्वराचा तुमच्यावरचा क्रोध ओसरेल. त्यास तुमची दया येईल तुमच्याबद्दल प्रेम वाटेल तुमच्या पूर्वजांना त्याने कबूल केल्याप्रमाणे त्याच्याकृपेने तुमच्या देशाची भरभराट होईल. 18 नगरे उध्वस्त करण्याविषयी तुमचा देव परमेश्वर याचे ऐकलेत, त्याच्या आज्ञा पाळल्यात तरच हे घडेल. तेव्हा तुमचा देव परमेश्वर याच्या दृष्टीने जे योग्य तेच तुम्ही करा.