14
परमेश्वर याकोबावर दया करील; तो इस्राएलाची पुन्हा निवड करील आणि त्यांना त्यांच्या स्वतःच्या देशात स्थापील. परके त्यांच्यात सहभागी होतील आणि ते स्वतः याकोबाच्या घराण्याला जडून राहतील. राष्ट्रे त्यांना आपल्या स्वतःच्या ठिकाणावर आणतील. मग इस्राएलाचे घराणे त्यांना परमेश्वराच्या देशात दास व दासी करून ठेवतील. ज्यांनी त्यास बंदिवान करून नेले होते त्यास ते बंदीत ठेवतील आणि ते आपल्या पीडणाऱ्यावर राज्य करतील.
त्या दिवशी तुझ्या दुःखापासून आणि यातनेपासून आणि तुजवर लादलेले कठीण दास्यापासून परमेश्वर तुला विसावा देईल, बाबेलाच्या राजा विरूद्धचे हे टोचणारे गाणे तू म्हणशील, “जाचणाऱ्याचा कसा नाश झाला आहे, गर्विष्ठाचा त्वेष संपला.
दुष्टाची काठी, अधिकाऱ्याचा जो राजदंड, तो परमेश्वराने मोडला आहे.
जो क्रोधाने लोकांस निरंतर ठोसे मारत असे,
तो रागाने राष्ट्रावर राज्य करीत असे, कोणाला आडकाठी घालता येईना असा हल्ला करत असे तो परमेश्वराने मोडला आहे.
सर्व पृथ्वी विसावा पावली आहे आणि शांत झाली आहे; त्यांनी गाणे गाऊन उत्सावाला सुरवात केली आहे.
लबानोनाचे गंधसरूबरोबर देवदारूवृक्षसुध्दा तुझ्यावर हर्षित होतात;
ते म्हणतात, ‘तू खाली पडलास तेव्हापासून लाकडे कापणारा आम्हावर चढून आला नाही.’
जेव्हा तू अधोलोकात खाली जाशील तेव्हा तुला भेटण्यास ते उत्सुक आहे.
तो तुजसाठी पृथ्वीवरील मरून गेलेल्या सर्व राजांना उठवील,
सर्व राष्ट्रांच्या राजांना आपल्या सिंहासनावरून उठवीत आहे.
10 ते सर्व बोलतील आणि तुला म्हणतील, ‘तू आमच्यासारखा अशक्त झाला आहे. तू आमच्या सारखा झाला आहे.
11 तुझा थाटमाट, तुझ्या तंतुवाद्यांच्या आवाज अधोलोकात खाली जात आहे.
तुझ्याखाली अळ्या पसरल्या आहेत आणि किडे तुला झाकत आहेत.’
12 हे र्देदीप्यमान ताऱ्या, प्रभातपुत्रा, तू आकाशातून खाली कसा पडला आहेस!
ज्या तू राष्ट्रांस जिंकले, तुला तोडून कसा जमिनीवर टाकला आहे!
13 जो तू आपल्या मनात म्हणालास, ‘मी आकाशात वर चढेन,
देवाच्या तांरागणाच्यावर उच्चस्थानी मी माझे सिंहासन करीन,
आणि उत्तरेच्या अगदी शेवटच्या भागात मी मंडळीच्या पर्वतावर बसेन.
14 मी मेघाच्या उंचीच्यावरती चढेन; मी परात्पर देवासारखा होईन.’
15 तथापि तुला आता खाली अधोलोकात, खोल खळग्यात आणले आहे.
16 जे तुझ्याकडे निरखून पाहतील; तुझ्याबद्दल विचार करतील.
ते म्हणतील, ‘ज्याने पृथ्वी थरथर कापविली व राज्ये डळमळविली तो हाच का पुरुष?
17 जो जग रानासारखे करीत असे, त्यांची नगरे उलथून टाकत असे आणि ज्यांने त्याच्या कैद्यांना आपल्या घरी जाऊ दिले नाही तो हाच का?’
18 सर्व राष्ट्रांचे राजे, त्यांच्यातील सर्व, गौरवाने प्रत्येकजण आपल्या स्वतःच्या कबरेत निजले आहेत.
19 पण, तुला फेकून दिलेल्या फांदीप्रमाणे तुझ्या कबरेतून काढून बाहेर फेकले आहे.
जे तलवारीने भोसकलेले, खाचेतल्या दगडांमध्ये खाली उतरले जातात, तसे तू मृत्युने झाकला आहेस.
20 जसे पाया खाली तुडवलेले मृत शरीर, तुला कधीच त्यांच्याबरोबर पुरण्यात येणार नाही,
कारण तू आपल्या देशाचा नाश केला आहे. तू आपले लोक वधले आहेत,
जे वाईट करणाऱ्यांची मुले आहेत आणि त्यांचा कधी पुन्हा उल्लेख होणार नाही.”
21 त्यांच्या पूर्वजांच्या अन्यायामुळे त्यांच्या मुलांसाठी तुम्ही कत्तल करण्याची तयारी करा,
म्हणजे ते उठणार नाहीत आणि पृथ्वी ताब्यात घेणार नाहीत व संपूर्ण जग नगरांनी भरणार नाही.
22 “मी त्यांच्याविरुद्ध उठेन,” असे सेनाधीश परमेश्वर जाहीर करतो.
“मी बाबेलापासून नाव, वंशज आणि भावी पिढ्या ह्यांना तोडून टाकीन,” हे परमेश्वर जाहीर करतो.
23 मी तिला घुबडाची मालमत्ता व पाण्याचे तळे असेही करीन,
आणि मी तिला नाशाच्या झाडूने झाडून टाकीन, असे सेनाधीश परमेश्वर जाहीर करतो.
अश्शूराचा नाश होणार
24 सेनाधीश परमेश्वराने शपथ वाहून म्हणाला,
खात्रीने, माझे जे उद्देश आहेत, त्याप्रमाणे होईल; आणि जसे मी योजले तसेच होईल.
25 मी आपल्या देशात अश्शूराला तोडीन आणि माझ्या पर्वतावर त्यास पायाखाली तुडवीन.
नंतर त्याचे जोखड त्यांच्यावरून निघेल आणि त्याचे ओझे त्यांच्या खांद्यावरून दूर सारले जाईल.
26 संपूर्ण पृथ्वीसाठी योजिलेला उद्देश हाच आहे आणि जो हात सर्व राष्ट्रांवर उगारलेला आहे तो हात हाच आहे.
27 कारण सेनाधीश परमेश्वराने हा संकल्प केला आहे; तो कोण थांबवू शकेल? त्याचा हात उगारलेला आहे, आणि तो कोणाच्याने मागे वळवू शकेल?
पलेशेथाविषयी देववाणी
28 राजा आहाजाच्या मृत्यूच्या वर्षात ही घोषणा आली.
29 अगे पलिष्टी, तुला मारणारी काठी मोडली आहे म्हणून आनंद करू नको.
कारण सापाच्या मुळातून फुरसे निघेल आणि उडता आग्या सर्प त्याचे फळ होईल.
30 गरीबाचे प्रथम जन्मलेले खातील,
आणि गरजवंत सुरक्षितेत पडून राहतील.
मी तुझे मूळ उपासमारीने मारीन तो तुझे उरलेले सर्व मारून टाकील.
31 वेशीनो मोठ्याने आक्रोश करा;
नगरांनो आरोळी करा.
पलिष्टी तू सर्व वितळून जाशील.
कारण उत्तरेकडून धुराचे ढग येत आहे आणि तेथे त्याच्या सैन्यात मागे राहणारा कोणी नाही.
32 तर त्या राष्ट्राच्या दूताला कोण एक उत्तर देईल?
परमेश्वराने सीयोन स्थापले आहे आणि त्याच्या लोकांतले पीडीत त्यामध्ये आश्रय घेतील.