16
देवाच्या कृत्यांविषयी ईयोबाची तक्रार
1 नंतर ईयोबाने उत्तर दिले आणि म्हणाला,
2 “या सर्व गोष्टी मी पूर्वी ऐकल्या आहेत, तुम्ही सर्व वायफळ सांत्वनकर्ते आहात.
3 तुमची वायफळ शब्द कधीही संपत नाहीत. तुम्हास काय झाले आहे कि, तुम्ही याप्रमाणे उत्तर देता?
4 जर तुमच्यासारखे मलाही बोलता आले असते, तर जे आता तुम्ही म्हणत आहात
तेच मीही म्हणू शकलो असतो.
मी तुमच्याविरुध्द शहाणपणाच्या गोष्टी सांगू शकलो असतो
आणि माझे डोके तुमच्यासमोर हलवू शकलो असतो.
5 अहो मी तुम्हास माझ्या मुखाने मी धीर दिला असता.
आणि माझ्या ओठाने तुमचे सांत्वन केले असते.
6 परंतु मी काहीही बोललो तरी माझ्या यातना कमी होत नाहीत.
पण मी बोललो नाहीतर माझ्या यातना कमी कशा होणार?
7 खरोखरच तू माझी शक्ती हिरावून घेतली आहेस. तू माझ्या सर्व कुटुंबाचा नाश केला आहेस.
8 तू मला खूप बारीक व अशक्त केले आहे म्हणून मी अपराधी आहे असे लोकांस वाटते.
9 देव माझ्यावर हल्ला करतो. तो माझ्यावर रागावला आहे आणि तो माझे शरीर छिन्न विछिन्न करतो. तो माझ्याविरुध्द दात खातो, माझ्या शत्रूचे डोळे माझ्याकडे तिरस्काराने बघतात.
10 लोक माझ्या भोवती जमले आहेत. ते माझी थट्टा करतात व तोंडावर मारतात.
11 देवाने मला दुष्ट लोकांच्या स्वाधीन केले आहे.
त्याने क्रूर मनुष्यांना मला त्रास द्यायची परवानगी दिली आहे.
12 मी अगदी मजेत होतो, पण देवाने मला चिरडून टाकले.
हो त्याने माझी मान पकडली आणि माझे तुकडे तुकडे केले
त्याने माझा निशाण्यासारखा उपयोग केला.
13 त्याचे धनुर्धारी मला घेरतात.
तो माझ्या कंबरेत बाण सोडतो तो दया दाखवीत नाही.
तो माझे पित्ताशय धरतीवर रिकामे करतो.
14 देव माझ्यावर पुन्हा पुन्हा हल्ला करतो.
सैनिकाप्रमाणे तो माझ्यावर चाल करून येतो.
15 मी फार दु:खी आहे म्हणून मी दु:खाचे कपडे घालतो.
मी इथे धुळीत आणि राखेत बसतो आणि मला पराभूत झाल्यासारखे वाटते.
16 रडल्यामुळे माझा चेहरा लाल झाला आहे.
माझ्या पापण्यांवर मरणाची छाया आहे.
17 तरीही माझ्या हातून कोणात्याही प्रकारची हिंसा झाली नाही,
आणि माझ्या प्रार्थना शुध्द आहेत. तरी असे झाले.
18 हे धरती, माझे रक्त लपवू नकोस.
माझ्या रडण्याला विश्रांतीस्थान देऊ नकोस.
19 स्वर्गात कदाचित् माझ्या बाजूचा कुणीतरी असेल.
जो माझी त्या सर्वसमर्थासमोर हमी घेईल.
20 माझे मित्र माझा उपहास करतात,
पण माझे डोळे देवासमोर अश्रू ढाळतात.
21 जशी एखादी व्यक्ती आपल्या मित्रासाठी वादविवाद करते
तसा तो माझ्याविषयी देवाबरोबर बोलतो.
22 जेव्हा काही वर्ष जातील,
तेव्हा मी पुन्हा कधीही परतून न येणाऱ्या जागी जाणार आहे.”