11
यथार्थ नसलेल्या तराजूचा परमेश्वरास वीट आहे,
पण तंतोतंत वजनात त्यास आनंद आहे.
जेव्हा गर्व येतो नंतर अप्रतिष्ठा येते,
पण विनम्रते बरोबर ज्ञान येते.
सरळांचा सात्विकपणा त्यांना मार्गदर्शन करतो,
पण विश्वासघातक्यांचा वाकडा मार्ग त्यांचा नाश करतो.
क्रोधाच्या दिवशी संपत्ती निरुपयोगी आहे,
परंतु नीतिमत्ता तुम्हास मरणापासून वाचवते.
निर्दोष व्यक्तीची सात्विक वागणूक त्याचे मार्ग सरळ करते,
परंतु दुर्जन आपल्या दुष्टतेने पतन पावतो.
जे देवाला प्रसन्न करतात त्यांचा सात्विकपणा त्यांना सुरक्षित ठेविल,
पण फसवणारा आपल्या दुष्कृतीनेच सापळ्यात अडकतो.
जेव्हा दुष्ट मनुष्य मरतो, त्याची आशा नष्ट होते;
आणि त्याचा भरवसा त्याच्या शक्तीत होता तो निष्फळ होतो.
नीतिमान संकटापासून दूर राहतो;
आणि त्याच्याऐवजी ती दुष्टांवर येतात.
अधर्मी आपल्या तोंडाने शेजाऱ्याचा नाश करतो,
पण नीतिमान आपल्या ज्ञानाने सुरक्षित राहतो.
10 जेव्हा नीतिमानाची उन्नती होते तेव्हा नगर आनंदित होते;
जेव्हा दुष्टांचा नाश होतो तेव्हा तेथे आनंदाचा जयघोष होतो.
11 जो कोणी आपल्या चांगल्या दानांनी देवाला संतोषवितो, तेव्हा नगर मोठे होते;
दुष्टांच्या तोंडामुळे नगर उद्ध्वस्त होते.
12 जो मनुष्य आपल्या मित्राला तुच्छ लेखतो तो बुद्धिहीन आहे,
परंतु समजदार मनुष्य शांत राहतो.
13 जो कोणी निंदा करीत फिरतो तो गुप्त गोष्टी उघड करतो,
परंतु जो विश्वासू व्यक्ती असतो तो त्यावर झाकण घालतो.
14 जेथे कोठे शहाण्याचे मार्गदर्शन नसते, राष्ट्र पडते,
पण पुष्कळ सल्लागार असल्याने विजय मिळतो.
15 जो कोणी अपरिचिताला जामीन राहील, त्याची खात्रीने हानी होईल,
परंतु जो कोणी त्याप्रकारची शपथ देण्याचे वचन देतो, तो त्याचा द्वेष करतो, तो सुरक्षित राहतो.
16 कृपाळू स्त्रीस आदर मिळतो,
परंतु निर्दयी लोक संपत्ती घट्ट पकडतात.
17 दयाळू मनुष्य आपले हित करतो,
पण जो क्रूर असतो तो स्वत:ला इजा करून घेतो.
18 दुष्ट मनुष्य त्याचे वेतन मिळविण्यासाठी लबाड बोलतो,
परंतु जो नीतीने पेरतो त्याचे वेतन सत्याची कापणी असते.
19 जो प्रामाणिक व्यक्ती नीतीने राहतो त्यास जीवन मिळेल,
पण जो दुष्कर्मामागे लागतो तो आपणावर मृत्त्यू आणतो.
20 जे मनाचे कुटिल असतात त्यांचा परमेश्वरास वीट आहे,
पण ज्यांचे मार्ग निर्दोष आहेत त्यांच्याविषयी त्यास आनंद वाटतो.
21 दुष्टांना शासन झाल्यावाचून राहणार नाही याची खात्री बाळगा,
परंतु नीतिमानांच्या वंशजांना सुरक्षित ठेवले जाईल.
22 डुकराच्या नाकात जशी सोन्याची नथ,
तशी तारतम्य नसलेली सुंदर स्त्री समजावी.
23 जे चांगले करतात त्यांच्या इच्छेचे परिणाम चांगलेच असतात;
पण दुष्टांची आशा फक्त क्रोधच असते.
24 तेथे कोणी एकजन बी पेरतो तो अधिक गोळा करतो;
दुसरा पेरीत नाही तो दरिद्री होईल.
25 उदार मनाचा इसम समृद्ध होतो,
आणि जो दुसऱ्याला पाणी पाजतो त्यास स्वतःला ते पाजण्यात येईल.
26 जो मनुष्य त्याचे धान्य विकायला नकार देतो त्यास लोक शाप देतात,
पण जो ते विकतो त्याच्या मस्तकी चांगल्या दानाचा मुकुट प्राप्त होईल.
27 जो कोणी परिश्रमाने चांगल्याचा शोध घेतो तो अनुग्रहाचा शोध करतो,
पण जो कोणी वाईटाचा शोध घेतो त्यास तेच प्राप्त होईल.
28 जो कोणी आपल्या श्रीमंतीवर विश्वास ठेवतो तो पडेल,
परंतु नीतिमान पानाप्रमाणे झपाट्याने वाढेल.
29 जो कोणी आपल्या स्वतःच्या घरावर संकटे आणतो त्याचे वतन वारा होईल,
आणि मूर्ख मनुष्य शहाण्याच्या हृदयाचा सेवक होईल.
30 नीतिमानाचे जीवन वृक्षासारखे आहे,
पण हिंसाचार जीवन दूर नेतो.
31 जर नीतिमानाला त्याच्या लायकीप्रमाणे फळ मिळते;
तर दुर्जनाला व पाप्याला किती अधिक मिळेल!