25
नीतिसूस्त्रांची तत्त्वे आणि काही तुलना
ही शलमोनाची आणखी काही नीतिसूत्रे आहेत. यहूदाचा राजा हिज्कीया याच्या मनुष्यांनी याचा नक्कल केली.
काही गोष्टी गुपित ठेवणे यामध्ये देवाचे गौरव आहे,
पण त्या गोष्टी शोधून काढणे यामध्ये राजाचे गौरव आहे.
जसे उंचीमुळे आकाशाचा आणि खोलीमुळे पृथ्वीचा,
तसे राजाचे मन गूढ आहे.
रुप्यातला गाळ काढून टाक,
आणि धातू कामगार रुप्याचा उपयोग त्याच्या कामासाठी करू शकेल.
त्याचप्रमाणे राजाच्या सानिध्यापासून दुष्टांना दूर कर
म्हणजे त्याचे राजासन जे काही चांगले आहे त्यांनी भक्कम होईल.
राजासमोर स्वत:ची प्रतिष्ठा मिरवू नको.
आणि थोर अधिकाऱ्यांच्या जागी उभा राहू नको.
कारण तुझ्यासमोर येणाऱ्या अधिपतीपुढे
तुझा पाणउतारा करण्यापेक्षा,
“वर येऊन बस” असे तुला म्हणावे हे अधिक चांगले आहे.
फिर्याद करायला जाण्याची घाई करू नको.
ती तू केलीस तर शेवटी तुझ्या शेजाऱ्याने तुला लज्जित केले
तर परिणामी काय करू असे तुला होऊन जाईल.
तुमचे आणि तुमच्या शेजाऱ्याचे वाद आपसात चर्चा करून मिटव,
आणि दुसऱ्याच्या गुप्त गोष्टी उघड करू नको.
10 केली तर कदाचित ऐकणारा तुझी अप्रतिष्ठा करील,
व हे दूषण तुला लागून राहील.
11 जसे रुपेरी तबकात सोन्याचे सफरचंद,
तसे निवडक चांगले शब्द बोलणे.
12 जसे सोन्याची अंगठी किंवा दागिना शुद्ध सोन्यापासून करतात,
तसाच दोष देणारा सुज्ञ ऐकणाऱ्याच्या कानांना आहे.
13 कापणीच्या समयी* उन्हाळ्यात जसे बर्फाचे पेय,
तसा विश्वासू दूत त्यास पाठवणाऱ्याला आहे
कारण तो आपल्या धन्याचा जीव गार करतो.
14 जे लोक भेटी देण्याचे वचन देतात पण देत मात्र कधीच नाहीत,
ते पाऊस न आणणारे ढग आणि वारा यांसारखे आहेत.
15 धीर धरल्याने राज्य करणाऱ्याचे मन वळते,
आणि मऊ जीभ हाड फोडते.
16 जर तुला मध सापडला तर तुला पुरे इतकाच खा;
जास्त खाल्ला तर तू ओकून टाकशील.
17 शेजाऱ्याच्या घरात सारखे जाऊ नका,
जर गेलात तर तो कंटाळून तुमचा तिरस्कार करायला लागेल.
18 जो कोणी मनुष्य आपल्या शेजाऱ्याविरूद्ध खोटी साक्ष देतो.
जसे युद्घात सोटा, तलवार किंवा तीक्ष्ण बाण वापरतात यांसारखा तो आहे.
19 संकटकाळी अविश्वासणाऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवणे,
हे तुटलेल्या दाताने खाणे किंवा लचकलेल्या पायाने चालणे ह्यासारखे आहे.
20 जो कोणी दु:खी हृदयापुढे गीत गातो,
तो थंड हवामानात अंगावरील कपडे काढून टाकण्यासारखा,
आणि सोड्यावर टाकलेल्या शिरक्यासारखा आहे.
21 तुमचा शत्रू जर भुकेला असला तर त्यास खायला अन्न दे
आणि तो जर तान्हेला असला तर त्यास प्यायला पाणी दे;
22 असे केल्याने त्याच्या मस्तकावर तू जळत्या निखाऱ्याची रास ठेवशील,
आणि परमेश्वर तुम्हास त्याचे प्रतिपळ देईल.
23 उत्तरेकडचा वारा पाऊस आणतो;
त्याचप्रमाणे जो कोणी गुप्त गोष्टी सांगतो तो चेहरा क्रोधाविष्ट करतो.
24 भांडखोर पत्नीबरोबर मोठ्या घरात राहण्यापेक्षा,
धाब्याच्या कोपऱ्यात राहाणे अधिक चांगले आहे.
25 तहानलेल्या जिवाला थंडगार पाणी,
तसे दूर देशातून आलेले चांगले वर्तमान आहे.
26 जसा घाणेरडा झालेला झरा किंवा नासलेले कारंजे,
तसा दुष्टाच्यासमोर भ्रष्ट झालेला नीतिमान आहे.
27 खूप मध खाणे चांगले नाही,
सन्मानावर सन्मान शोधणे हे तसेच आहे.
28 जर मनुष्य स्वत:वर ताबा मिळवू शकत नसेल,
तर तो तटबंदी मोडून पडलेल्या शहरासारखा आहे.

*25:13 उन्हाळ्यात