25
मार्गदर्शन, क्षमा आणि संरक्षण ह्यांसाठी प्रार्थना
दाविदाचे स्तोत्र.
हे परमेश्वरा, मी आपला जीव तुझ्याकडे उंचावतो.
माझ्या देवा, तुझ्यात माझा विश्वास आहे.
मला निराश होऊ देऊ नको,
माझे शत्रू माझ्यावर हर्ष न करोत.
तुझ्या विश्वासणाऱ्याची कधी निराशा होत नाही.
परंतु जे कारण नसताना विश्वासघात करतात, ते लाजवले जातील.
हे परमेश्वरा तुझे मार्ग मला कळव,
मला तुझे मार्ग शिकव.
तू आपल्या सत्यात मला मार्ग दाखव आणि मला शिकव.
कारण तू माझा तारणारा देव आहेस
मी रोज तुझी वाट पाहतो.
हे परमेश्वरा, तुझ्या दयाळू कृत्यांची आणि प्रेमदयेची आठवण कर.
हे परमेश्वरा, माझे तरुणपणाचे पाप आणि माझा बंडखोरपणा आठवू नको.
तू आपल्या प्रेमदयेला अनुसरून आपल्या चांगुलपणामुळे माझी आठवण कर.
परमेश्वर चांगला आणि प्रामाणिक आहे.
यास्तव तो पाप्यांस मार्ग शिकवतो.
तो नम्र जणांस न्यायाने मार्गदर्शन करतो.
आणि दीनांना आपला मार्ग शिकवीतो.
10 जे त्याचे करार आणि वचने पाळतात त्यांच्यासाठी परमेश्वराचे मार्ग प्रेमदया व विश्वासयोग्य आहेत.
11 परमेश्वरा, तुझ्या नामास्तव,
माझ्या अपराधांची क्षमा कर, कारण ते खूप आहेत.
12 परमेश्वराचे भय धरतो असा मनुष्य कोण आहे?
प्रभू त्यास सूचना देईल, की त्याने कोणते मार्ग निवडावे.
13 त्याचे जीवन चांगुलपणात जाईल,
आणि त्याची संतान भूमीचे वतन पावतील.
14 परमेश्वराचे सत्य त्याचे अनुकरण करणाऱ्यांबरोबर असते.
आणि तो त्याचे करार कळवतो.
15 मी नेहमी परमेश्वराकडे आपली दृष्टी लावतो.
कारण तो माझे पाय जाळ्यातून मुक्त करतो.
16 परमेश्वरा माझ्याकडे फिर आणि माझ्यावर दया कर.
कारण मी एकटा आणि पीडलेला आहे.
17 माझ्या हृदयाचा त्रास वाढला आहे,
संकटातून मला तू काढ.
18 परमेश्वरा, माझे दु:ख आणि कष्ट बघ,
माझ्या सर्व पापांची क्षमा कर.
19 माझ्या सर्व शत्रूंकडे पाहा, कारण ते पुष्कळ आहेत.
ते माझा कठोरपणे तिरस्कार करतात.
20 देवा, माझे रक्षण कर आणि मला वाचव.
माझा तुझ्यावर विश्वास आहे, तेव्हा माझी निराशा करू नकोस.
21 तुझा प्रामाणिकपणा आणि सरळपणा माझे रक्षण करोत.
कारण माझा तुझ्यावर विश्वास आहे.
22 देवा, इस्राएलाच्या लोकांस त्यांच्या सर्व त्रासांपासून सोडव.