41
रोगनिवारणार्थ प्रार्थना
मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र.
1 जो मनुष्य गरीबांची चिंता करतो तो आशीर्वादित आहे.
त्याच्या संकटाच्या दिवशी परमेश्वर त्यास वाचवेल.
2 परमेश्वर त्यास राखेल आणि त्यास जिवंत ठेवेल.
आणि पृथ्वीवर तो आशीर्वादित होईल.
परमेश्वर त्यास त्याच्या शत्रूंच्या इच्छेवर सोडणार नाही.
3 तो अंथरुणावर दुखणाईत असता परमेश्वर त्यास आधार देईल.
तू त्याचे आजाराचे अंथरुण आरोग्यामध्ये पालटशील.
4 मी म्हणालो, “परमेश्वरा, माझ्यावर दया कर.
माझा जीव निरोगी कर, कारण मी तुझ्याविरूद्ध पाप केले आहे.”
5 माझे शत्रू माझ्याविषयी वाईट बोलतात. ते म्हणतात,
“तो कधी मरेल आणि त्याचे नाव विस्मरणात जाईल?”
6 माझे शत्रू मला पाहायला आले असता ते व्यर्थ शब्द बोलतात.
त्यांचे हृदय माझ्यासाठी खोटी साक्ष गोळा करते.
जेव्हा ते माझ्यापासून दूर जातात तर दुसऱ्यांना देखील हेच सांगतात.
7 माझे शत्रू माझ्याबद्दलच्या वाईट गोष्टी कुजबुजतात,
ते माझ्याविरूध्द वाईट गोष्टींच्या योजना आखतात.
8 ते म्हणतात, “त्याला वाईट रोग पकडून ठेवो.
म्हणजे तो पडून राहो, तो कधीच उठणार नाही, असे ते म्हणतात.”
9 माझा सर्वांत चांगला मित्र माझ्याबरोबर जेवला.
मी त्याच्यावर विश्वास ठेवला.
पण आता तो माझ्याविरूद्ध गेला आहे.
10 परंतू हे परमेश्वरा, तू माझ्यावर दया कर आणि मला उठून उभे कर.
म्हणजे मग मी त्यांची परतफेड करेन.
11 माझे वैरी माझ्यावर जयोत्सोव करत नाही,
यावरुन मी जाणतो की, तू माझ्या ठायी संतोष पावतोस.
12 मला तर तू माझ्या प्रामाणिकपणात पाठिंबा देतोस,
आणि सदासर्वकाळ आपल्या मुखापुढे ठेवतोस.
13 परमेश्वर, इस्राएलाच्या देवाची
अनादिकाळापासून तर सर्वकाळापर्यंत स्तुती असो,
आमेन, आमेन.