55
विश्वासघातक्यांचा नाश व्हावा म्हणून प्रार्थना
मुख्य गायकासाठी; तंतूवाद्दावरचे दाविदाचे स्तोत्र.
1 हे देवा, माझ्या प्रार्थनेकडे कान लाव,
आणि माझ्या विणवनीपासून लपू नकोस.
2 देवा, माझ्याकडे लक्ष लाव आणि मला उत्तर दे
माझ्या संकटात मला विसावा नाही.
3 माझ्या शत्रूंच्या आवाजामुळे,
दुष्टाच्या जुलूमामुळे मी कण्हत आहे,
कारण ते माझ्यावर संकट आणतात,
आणि द्वेषात माझा पाठलाग करतात.
4 माझे हृदय फार दुखणाईत आहे,
आणि मृत्यूचे भय माझ्यावर येऊन पडले आहे.
5 भय आणि थरथरने माझ्यावर आली आहेत,
आणि भयाने मला ग्रासले आहे.
6 मला कबूतरासारखे पंख असते तर किती बरे झाले असते.
मी दूर उडून गेलो असतो आणि स्वस्थ राहिलो असतो.
7 मी खूप दूर भटकत गेलो असतो.
मी रानात राहिलो असतो.
8 वादळी वाऱ्यापासून मला आश्रय मिळावा म्हणून मी लवकर पळालो असतो.
9 प्रभू, त्यांना नाश कर, आणि त्यांच्या भाषेत गोंधळ निर्माण कर.
कारण मी शहरात हिंसा आणि भांडणे पाहिली आहेत.
10 दिवस रात्र ते भींतीवर चढून जातात;
अपराध आणि अनर्थ तिच्यामध्ये आहेत.
11 दुष्टपणा तिच्यामध्ये कार्य करत आहे,
जुलूम आणि कपट कधीही तिच्या रस्त्यांना सोडत नाही.
12 कारण जर माझ्या शत्रूंनी मला दोष लावला असता तर
तर मला कळून आले असते,
किंवा माझा द्वेष करणारा जो माझ्याविरूद्ध उठला असता,
तर मी स्वतःला त्याजपासून लपवले असते.
13 परंतु मला संकटात टाकणारा तू आहेस,
माझा मित्र, माझा साथीदार, माझा दोस्त.
14 एकमेकांसोबत आपली गोड सहभागिता होती.
आपण समुदायांबरोबर चालत देवाच्या घरात जात होतो.
15 मृत्यू त्यांच्यावर अकस्मात येवो.
जीवंतपणी ते मृतलोकांत खाली जावोत.
कारण त्यांच्या जगण्यात दुष्टपण आहे.
16 मी तर देवाला हाक मारीन,
आणि परमेश्वर मला तारील.
17 मी देवाशी सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी आपले गाऱ्हाणे करेन आणि कण्हेन.
आणि तो माझी वाणी ऐकेल.
18 माझ्याविरूद्ध लढाणाऱ्यांपासून त्याने मला खंडूण, माझा जीव शांततेत ठेवला आहे.
कारण माझ्याविरूद्ध लढणारे पुष्कळ होते.
19 देव, जो पुरातन काळापासून आहे,
तो ऐकणार आणि त्यांना प्रतिसाद देणार, (सेला)
ते मनुष्ये बदलत नाहीत;
ती देवाला भीत नाहीत.
20 माझ्या मित्रांनी त्याच्या सोबत शांतीने राहणाऱ्यांवर आपला हात उगारला आहे.
त्याने आपला करार मोडला आहे.
21 त्यांचे तोंड लोण्यासारखे आहे,
परंतू त्याचे हृदय शत्रुत्व करणारेच आहे.
त्यांचे शब्द तेलापेक्षा बुळ्बुळीतआहेत,
तरी ते बाहेर काढलेल्या तलवारी सारखे आहे.
22 तू आपला भार परमेश्वरावर टाक,
म्हणजे तो तुला आधार देईल.
तो नितीमानाला कधी पडू देणार नाही.
23 परंतू हे देवा, तू त्यांना नाशाच्या खांचेत पाडून टाकशील;
घातकी आणि कपटी मनुष्ये आपले अर्धे आयुष्यही जगणार नाहीत,
परंतू मी तुझ्यावर विश्वास ठेवीन.