62
आपली भिस्त केवळ देवावर
दाविदाचे स्तोत्र
माझा जीव निशब्द होऊन केवळ देवाची प्रतिक्षा करत आहे;
त्याच्यापासून माझे तारण येते.
तोच केवळ माझा खडक आणि माझे तारण आहे;
तो माझा उंच बुरूज आहे; मी कधीही ढळणार नाही.
झुकलेल्या भिंतीसारख्या, कोसळलेल्या कुंपणासारखा झालेल्या,
एका मनुष्यास मारण्यासाठी तुम्ही सर्वजण
किती काळपर्यंत त्याच्यावर हल्ला करून याल?
त्याच्या उच्च पदापासून त्यास खाली आणण्यासाठी मात्र ते सल्ला घेतात;
त्यांना लबाड बोलण्यास आवडते;
ते आपल्या मुखाने आशीर्वाद देतात, पण त्यांच्या अंतःकरणातून शाप देतात.
हे माझ्या जिवा, तू केवळ देवासाठी निशब्द राहून प्रतिक्षा कर;
कारण माझी आशा त्याच्यावर लागली आहे.
तोच केवळ माझा खडक आणि तारण आहे;
तो माझा उंच बुरूज आहे; मी ढळणार नाही.
माझे तारण आणि माझे गौरव देवावर अवलंबून आहे;
माझ्या सामर्थ्याचा खडक आणि माझा आश्रय देवच आहे.
अहो लोकहो, सर्वदा त्याच्यावर भरवसा ठेवा;
त्याच्यापुढे आपले अंतःकरण मोकळे करा;
देव आमच्यासाठी आश्रय आहे.
खरोखर नीच माणसे निरर्थक आहेत, आणि उच्च माणसे लबाड आहेत;
वजन केले असता हलके भरतील; त्यांना मापले असता ते केवळ मिथ्या आहेत.
10 दडपशाहीवर आणि चोरीवर भरवसा ठेवू नका;
आणि संपत्तित निरुपयोगी आशा ठेवू नका;
11 देव एकदा बोलला आहे,
मी दोनदा ऐकले आहे,
सामर्थ्य देवाचे आहे.
12 हे प्रभू, तुझ्या ठायी प्रेमदया आहे.
कारण प्रत्येक मनुष्यास त्याने जसे केले आहे त्याप्रमाणे तू प्रतिफळ देतोस.