109
सूडासाठी याचना
दाविदाचे स्तोत्र
हे माझ्या स्तवनाच्या देवा, शांत राहू नको.
कारण दुष्ट आणि कपटी माझ्यावर हल्ला करतात;
ते माझ्याविरूद्ध खोटे बोलतात.
त्यांनी मला वेढले आहे आणि माझ्याबद्दल द्वेषयुक्त गोष्टी सांगतात.
आणि ते विनाकारण माझ्यावर हल्ला करतात.
माझ्या प्रेमाच्या बदल्यात ते माझी निंदानालस्ती करतात.
पण मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो.
मी केलेल्या चांगल्यासाठी वाईट,
आणि त्यांनी माझ्या प्रीतीची फेड द्वेषाने केली.
या लोकांवर तू दुर्जन मनुष्यास शत्रूसारखा नेम;
त्यांच्या उजव्या हाताकडे आरोप करणाऱ्याला उभा ठेव.
जेव्हा त्याचा न्याय होईल, तेव्हा तो अपराधी म्हणून सापडो;
त्याची प्रार्थना पापच मानली जावो.
त्याचे दिवस थोडे होवोत;
दुसरा त्याचा अधिकार घेवो;
त्याची मुले पितृहीन
आणि त्याची पत्नी विधवा होवो.
10 त्याची मुले इकडे तिकडे भटकत आणि भीक मागत फिरोत,
ती आपल्या ओसाड ठिकाणाहून दूर जाऊन निवेदन करोत.
11 सावकार त्यांचे सर्वस्व हिरावून घेवो;
त्याची कमाई परके लुटून घेवोत;
12 त्यांना कोणीही दया देऊ नये;
त्याच्या पितृहीन मुलांची कोणीही कीव करू नये.
13 त्याचे वंशज कापून टाकली जावोत;
पुढच्या पिढीत त्याचे नाव खोडले जावो.
14 परमेश्वरास त्याच्या पूर्वजांच्या पापांची आठवण राहो.
त्याच्या आईची पापे कधीही विसरली न जावोत.
15 परमेश्वरापुढे त्यांचे पातक सदैव असोत;
परमेश्वर त्यांचे स्मरण पृथ्वीवरून काढून टाको.
16 कारण या मनुष्याने कधीही दया दाखविण्याची पर्वा केली नाही,
परंतु त्याऐवजी पीडलेल्यांचा छळ आणि गरजवंत
व धैर्य खचलेल्यांचा वध केला.
17 त्यास शाप देणे आवडते, म्हणून तो परत त्याच्यावर आला.
त्याने आशीर्वादाचा द्वेष केला; म्हणून त्याच्यावर आशीर्वाद आले नाहीत.
18 त्याने त्याच्या वस्राप्रमाणे आपल्याला शापाचे वस्र पांघरले,
आणि त्याचे शाप हे पाण्याप्रमाणे त्याच्या अंतर्यामात,
तेलासारखे त्याच्या हाडात आले.
19 त्याचे शाप त्यास पांघरावयाच्या वस्राप्रमाणे होवो,
ते नेहमी वापरावयाच्या कंबरपट्ट्याप्रमाणे तो त्यास वेढून राहो.
20 माझ्या आरोप्यास,
माझ्याविरूद्ध वाईट बोलणाऱ्यास परमेश्वराकडून हेच प्रतिफळ आहे
21 हे परमेश्वरा, माझा प्रभू, कृपा करून तुझ्या नावाकरता मला वागवून घे.
कारण तुझ्या कराराची विश्वसनियता उत्तम आहे म्हणून मला वाचव.
22 कारण मी पीडित आणि गरजवंत आहे,
आणि माझे हृदय माझ्यामध्ये घायाळ झाले आहे.
23 मी संध्याकाळच्या सावल्यांप्रमाणे दिसेनासा झालो आहे;
मी टोळाप्रमाणे हुसकावला जात आहे.
24 उपासाने माझे गुडघे अशक्त झाले आहेत;
मी त्वचा आणि हाडे असा होत आहे.
25 माझा विरोध्यास मी निंदेचा विषय झालो आहे,
ते जेव्हा माझ्याकडे बघतात, तेव्हा आपले डोके हालवतात.
26 हे माझ्या परमेश्वरा, माझ्या देवा, मला मदत कर;
तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेने माझा उध्दार कर.
27 हे परमेश्वरा, त्यांनी हे जाणावे की,
ही तुझी करणी आहे, तूच हे केले आहेस.
28 जरी त्यांनी मला शाप दिला, पण कृपा करून मला आशीर्वाद दे;
जेव्हा ते हल्ला करतील, तेव्हा ते लज्जित होतील,
परंतु तुझा सेवक आनंदी होईल.
29 माझे विरोधी वस्राप्रमाणे लाज पांघरतील,
आणि ते त्यांची लाज झग्याप्रमाणे पांघरतील.
30 मी आनंदाने आपल्या मुखाने मनापासून परमेश्वरास धन्यवाद देईन;
लोकसमुदायासमोर मी त्याची स्तुती करीन.
31 कारण तो पीडितांना धमकी देणाऱ्यांपासून,
त्यांचे तारण करायला तो त्यांच्या उजव्या हाताला उभा राहतो.