116
मृत्यूपासून सुटका झाल्याबद्दल उपकारस्तुती
1 मी परमेश्वरावर प्रेम करतो कारण तो
माझी वाणी आणि माझ्या विनंत्या दयेसाठी ऐकतो.
2 कारण तो माझे ऐकतो,
म्हणून मी जिवंत आहे तोपर्यंत मी त्यास हाक मारीन.
3 मृत्यूचे दोर माझ्याभोवती आवळले,
आणि मला अधोलोकांच्या यातना झाल्या,
संकट व क्लेश मला झाले.
4 नंतर मी परमेश्वराच्या नावाचा धावा केला,
“हे परमेश्वरा, मी तुला विनंती करतो, मला वाचव.”
5 परमेश्वर कृपाळू आणि न्यायी आहे;
आमचा देव कनवाळू आहे.
6 परमेश्वर भोळ्यांचे रक्षण करतो;
मी दीनावस्थेत होतो तेव्हा त्याने माझे तारण केले.
7 हे माझ्या जिवा तू आपल्या विश्रामस्थानी परत ये;
कारण परमेश्वराने तुझ्यावर पुष्कळ उपकार केले आहेत.
8 तू माझा जीव मृत्यूपासून,
माझे डोळे अश्रूपासून,
आणि माझे पाय अडखळण्यापासून मुक्त केले आहेत.
9 जीवंताच्या भूमित परमेश्वराची
सेवा करणे मी चालूच ठेवीन.
10 मी फार पीडित आहे
असे जेव्हा मी म्हणालो, तरी माझा त्याच्यावर विश्वास आहे.
11 मी अविचाराने म्हणालो की,
सगळे माणसे खोटारडे आहेत.
12 परमेश्वराने माझ्यावर केलेल्या
सर्व उपकाराची मी कशी परतफेड करू?
13 मी तारणाचा प्याला उंचावून
परमेश्वराच्या नावाने हाक मारीन.
14 त्याच्या सर्व लोकांसमोर,
मी परमेश्वरास केलेले नवस पूर्ण करीन.
15 परमेश्वराच्या दृष्टीने
त्याच्या भक्तांचा मृत्यू अमोल आहे.
16 हे परमेश्वरा, मी खरोखर तुझा सेवक आहे;
मी तुझा सेवक, तुझी दासी असलेल्या स्त्रीचा मुलगा आहे;
माझी बंधने तू सोडली आहेस.
17 मी तुला उपकाराचा यज्ञ अर्पण करीन
आणि मी परमेश्वराचे नामस्मरण करीन.
18 मी त्याच्या सर्व लोकांसमोर
परमेश्वरास केलेले नवस पूर्ण करीन.
19 परमेश्वराच्या घराच्या अंगणात,
यरूशलेमा तुझ्यामध्ये ते फेडीन.
परमेश्वराची स्तुती करा.