स्तोत्र. 39. मुख्य गायकासाठी; यदूथूनासाठी, दाविदाचे स्तोत्र. मी ठरवले “मी जे बोलेन त्याकडे लक्ष देईन, म्हणजे मी माझ्या जीभेने पाप करणार नाही.” मी स्तब्ध राहिलो, चांगले बोलण्यापासूनही मी आपले शब्द आवरले. आणि माझ्या वेदना आणखी वाईट तऱ्हेने वाढल्या. माझे हृदय तापले, जेव्हा मी या गोष्टींविषयी विचार करत होतो, तेव्हा ते अग्नीप्रमाणे पेटले. तेव्हा शेवटी मी बोललो. हे परमेश्वरा, माझ्या जीवनाचा अंत केव्हा आहे, आणि माझ्या आयुष्याचे दिवस किती आहेत हे मला कळू दे, मी किती क्षणभंगुर आहे ते मला दाखव. माझे आयुष्य किती लहान आहे ते मला कळू दे. पाहा, तू माझे दिवस हाताच्या रुंदी इतके केले आहेत. आणि माझा जीवनकाल तुझ्यासमोर काहीच नाही. खचित मनुष्य केवळ एक श्वासच आहे. खचित प्रत्येक मनुष्य हा सावलीसारखा चालतो, खचित प्रत्येकजण संपत्ती साठवण्यासाठी घाई करतो, पण त्यांना हे कळत नाही कोणास ते प्राप्त होणार. हे प्रभू, आता मी कशाची वाट पाहू? तूच माझी एक आशा आहेस! माझ्या अपराधांवर मला विजय दे, मला मूर्खांच्या अपमानाची वस्तू होऊ देऊ नको. मी मुका राहिलो, मी आपले तोंड उघडले नाही. कारण हे तुच केले आहेस. मला जखमा करणे थांबव, तुझ्या हाताच्या माराने मी क्षीण झालो आहे. जेव्हा तू लोकांस पापांबद्दल शिकवण करतोस. कसरीप्रमाणे तू त्यांची शक्ती खाऊन टाकतो. खचित सर्व मनुष्य फक्त वाफ आहेत. (सेला) परमेश्वरा माझी प्रार्थना ऐक, माझ्याकडे कान लाव. माझे रडणे ऐक, कारण तुझ्याजवळ परका, माझ्या पूर्वजांसारखा उपरी आहे. तुझे माझ्यावरील टक लावून बघने फिरव, म्हणजे मी मरणाच्या आधी पुन्हा हर्षीत होईल.