स्तोत्र. 135. परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराच्या नावाची स्तुती करा. परमेश्वराच्या सेवकांनो, तुम्ही त्याची स्तुती करा. परमेश्वराच्या घरात उभे राहाणाऱ्यांनो, आमच्या देवाच्या घराच्या अंगणात उभे राहाणाऱ्यांनो, तुम्ही त्याची स्तुती करा. परमेश्वराची स्तुती करा, कारण तो चांगला आहे; त्याच्या नावाचे गुणगान करा कारण ते करणे आनंददायक आहे. कारण परमेश्वराने याकोबाला आपल्यासाठी निवडले आहे, इस्राएल त्याच्या मालमत्तेप्रमाणे आहे. परमेश्वर महान आहे हे मला माहीत आहे, आमचा प्रभू सर्व देवांच्या वर आहे. परमेश्वराची जी इच्छा आहे तसे तो आकाशात, पृथ्वीवर, समुद्रात आणि खोल महासागरात करतो. तो पृथ्वीच्या शेवटापासून ढग वर चढवतो. तो पावसासाठी विजा निर्माण करतो; आणि आपल्या भांडारातून वारे बाहेर आणतो. त्याने मिसर देशातील मनुष्यांचे आणि प्राण्यांचे दोघांचे पहिले जन्मलेले मारून टाकले. हे मिसरा, त्याने तुझ्यामध्ये, फारो व त्याचे सर्व सेवक यांच्याविरूद्ध चिन्ह व चमत्कार पाठवले. त्याने पुष्कळ राष्ट्रांवर हल्ला केला, आणि शक्तीमान राजांना मारून टाकले, अमोऱ्यांचा राजा सीहोन व बाशानाचा राजा ओग आणि कनानमधल्या सर्व राज्यांचा पराभव केला. त्यांचा देश त्याने वतन असा दिला, आपल्या इस्राएल लोकांसाठी वतन करून दिला. हे परमेश्वरा, तुझे नाव सर्वकाळ टिकून राहिल, हे परमेश्वरा, तुझी किर्ती सर्व पिढ्यानपिढ्या राहील. कारण परमेश्वर आपल्या लोकांचा न्याय करील, आणि त्यास आपल्या सेवकांचा कळवळा येईल. राष्ट्रांच्या मूर्ती सोन्या व रुप्याच्या आहेत, त्या मनुष्याच्या हाताचे काम आहेत. त्या मूर्त्यांना तोंड आहे, पण त्या बोलत नाहीत; त्यांना डोळे आहेत पण त्या पाहत नाहीत. त्यांना कान आहेत, पण त्या ऐकत नाहीत, त्यांच्या मुखात मुळीच श्वास नाही. जे त्या बनवितात, जे प्रत्येकजण त्याच्यावर भरवसा ठेवणारे त्यांच्यासारख्याच त्या आहेत. हे इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वराचा धन्यवाद करा; अहरोनाच्या वंशजांनो, परमेश्वराचा धन्यवाद करा. लेवीच्या वंशजांनो, परमेश्वराचा धन्यवाद करा. परमेश्वराचा आदर करणाऱ्यांनो परमेश्वराचा धन्यवाद करा. जो परमेश्वर यरूशलेमेत राहतो, त्याचा धन्यवाद सियोनेत होवो. परमेश्वराची स्तुती करा.