1 तीम. 3. हे वचन विश्वसनीय आहेः जर कोणी अध्यक्ष सर्वांगीण काळजीवाहक होण्याची इच्छा धरतो तर तो चांगल्या कामाची इच्छा धरतो. तर अध्यक्ष हा निर्दोष, एका पत्नीचा पती, मिताचारी, सावधान, मर्यादशील, पाहुणचार करणारा, शिकवण्यात निपुण, असा असावा. तो मद्य पिणारा किंवा मारका (किंवा घाणेरड्या लाभाची आवड धरणारा) नसावा तर तो सौम्य, न भांडणारा, पैशाचा लोभ न धरणारा. आपल्या स्वतःच्या घरावर चांगल्या प्रकारचा अधिकार चालवणारा, पूर्ण गंभीरपणे आपल्या मुलांना स्वाधीन राखणारा असा तो असावा. जर एखाद्याला स्वतःच्या कुटुंबाची देखभाल करता येत नसेल तर तो देवाच्या मंडळीची काळजी कशी घेईल? तो या कार्यात नवशिका नसावा म्हणजे तो गर्वाने फुगून सैतानाच्या दंडात पडू नये. त्याचे बाहेरच्या लोकांमध्ये चांगले नाव असावे. यासाठी की त्याच्यावर टीका होऊ नये व त्याने सैतानाच्या जाळ्यात सापडू नये. त्याचप्रमाणे सेवकही प्रतिष्ठित असावेत, ते दुतोंडी किंवा मद्यपान करणारे नसावेत आणि अनीतिने पैसे मिळवून श्रीमंत होण्याची त्यांना आवड नसावी. देवाने जे आम्हास प्रकट केले आहे ते आमच्या विश्वासाचे सखोल सत्य त्यांनी शुद्ध विवेकाने धरून ठेवावे. वडीलांप्रमाणे यांचीसुद्धा प्रथम परीक्षा व्हावी, मग निर्दोष ठरल्यास, त्यांनी सेवकपण करावे. त्याचप्रमाणे, स्त्रियांनीही गंभीर असावे, त्या चहाडखोर नसाव्यात. तर सभ्य व प्रत्येक बाबतीत विश्वसनीय असाव्यात. प्रत्येक सेवक एका पत्नीचा पती असावा आणि त्यांनी त्यांच्या मुलांची व कुटुंबाची चांगल्या प्रकारे काळजी घ्यावी. कारण ज्यांनी सेवकपण चांगले केले, ते आपणास चांगली पदवी आणि ख्रिस्त येशूवरील विश्वासांत फार धैर्य मिळवतात. मी तुझ्याकडे लवकरच येण्याची आशा धरून असलो तरी मी तुला या गोष्टी लिहिल्या आहे. तरी मला उशीर लागल्यास, देवाचे घर म्हणजे जिवंत देवाची मंडळी जी सत्याचा खांब व पाया आहे, त्या देवाच्या घरात तुला कसे वागले पाहिजे, हे तुला समजावे. सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे तो देहात प्रकट झाला, आत्म्याने तो नीतिमान ठरवला गेला, तो देवदूतांच्या दृष्टीस पडला, राष्ट्रांमध्ये गाजवला गेला, जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला, तो गौरवात वर घेतला गेला.